Ads

चोहोट्टा बाजार ग्रामसभेच्या नोटिशीचा ‘खेळ’ संशयाच्या भोवऱ्यात! तारीख-वेळ नाही, सह्या आहेत; ग्रामसेवक मात्र गैरहजर!

By Nilesh Sir

August 29, 2026 5:14 pm

Ads

ग्रामसभा म्हणजे गावकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे लोकशाहीचे व्यासपीठ; मात्र चोहोट्टा बाजार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवरून आता याच लोकशाहीच्या कारभारावर गंभीर सवाल उपस्थित झाले आहेत. ग्रामसभेची अधिकृत नोटीस काढली, ग्रामस्थांना बोलावले; पण ग्रामसभेचे सचिवच गैरहजर! त्यातच तारीख आणि वेळेचा उल्लेख नसलेल्या नोटिशीवर सरपंच व ग्रामसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा मुद्दा समोर आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत चोहोट्टा बाजार येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेबाबत नोटीस काढण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले. मात्र, ग्रामसभेचे सचिव म्हणून जबाबदारी असलेले ग्रामसेवक श्री. मंगलकर अनुपस्थित राहिल्याचा आरोप तक्रारदार पुरुषोत्तम वडाळ यांनी केला आहे.

ग्रामसेवक कोणतीही पूर्वपरवानगी किंवा समाधानकारक कारण न देता ग्रामसभेला अनुपस्थित राहिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामसभेचे कामकाज नियमानुसार पार पाडण्यात अडथळा निर्माण झाल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे.

तारीख-वेळ नाही, मग स्वाक्षऱ्या कशाच्या?

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे ग्रामसभेच्या नोटिशीवर तारीख आणि वेळेचा उल्लेख नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नोटिशीवर ग्रामपंचायत प्रशासक सरपंच संगीता राणे तसेच ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा मुद्दा तक्रारदार पुरुषोत्तम वडाळ यांनी उपस्थित केला आहे.

तारीख आणि वेळच नमूद नसलेल्या नोटिशीवर स्वाक्षऱ्या कशा झाल्या? नोटीस नेमकी कधी काढण्यात आली? ग्रामसभेची वेळ काय होती? असे थेट सवाल आता उपस्थित होत आहेत.

त्यामुळे केवळ ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीची चौकशी करून चालणार नाही, तर ग्रामसभेच्या नोटिशीवरील तारीख, वेळ, स्वाक्षऱ्या आणि संबंधित कागदपत्रांचीही सखोल तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

‘ग्रामसभा’ की प्रशासकीय बेफिकिरी?

ग्रामसभा ही ग्रामस्थांच्या समस्या, विकासकामे आणि शासकीय योजनांवर चर्चा करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अशा ग्रामसभेलाच संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांच्या अधिकारावर गदा आल्याची भावना निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार पुरुषोत्तम वडाळ यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अकोट यांच्याकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामसेवक श्री. मंगलकर यांच्याकडून अनुपस्थितीबाबत लेखी खुलासा घेण्यात यावा आणि अनुपस्थिती विनापरवानगी व कर्तव्यात कसूर करणारी असल्याचे निष्पन्न झाल्यास निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामसभेची कागदपत्रे तपासा, अहवाल ग्रामस्थांसमोर ठेवा!

ग्रामसभेचे कामकाज, उपस्थिती नोंद, ग्रामसभेची नोटीस, अनुपस्थितीचे कारण आणि संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून त्याचा अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही पुरुषोत्तम वडाळ यांनी केली आहे.

आता चोहोट्टा बाजार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या नोटिशीवरील तारीख-वेळेचा मुद्दा आणि ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीची प्रशासन चौकशी करणार का? दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!