“हा सप्ताह त्या दिवसानुसार साजरा केलेला बरा, कारण मनाचा आणि आयुष्याचा काही भरोसा ठरत नाही” हे वाक्य आजच्या काळाच्या वास्तवावर नेमके बोट ठेवणारे आहे.
अकोला अकोला न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी अनुराग अभंग:- सध्या देशभर आणि राज्यभर व्हॅलेंटाईन डे सप्ताहाची जोरदार चर्चा सुरू आहे. गुलाब, प्रस्ताव, वचनं, भेटवस्तू आणि सोशल मीडियावर झळकणाऱ्या ‘परफेक्ट’ प्रेमकथांमुळे तरुणाई या सप्ताहात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. मात्र, या प्रत्येक दिवसामागील अर्थ, मर्यादा आणि वास्तव समजून न घेता अपेक्षांचा डोंगर उभा राहतो आहे आणि त्याच डोंगराखाली अनेक मनं दबली जात आहेत.
व्हॅलेंटाईन सप्ताह हा आनंद, जिव्हाळा आणि भावना व्यक्त करण्याचा काळ असायला हवा. पण प्रत्यक्षात तो अनेकांसाठी हिरमोड, मनभंग आणि भावनिक अस्थैर्य घेऊन येतो आहे. कारण अपेक्षा मोठ्या आहेत, पण त्या पेलण्याची मानसिक तयारी कमी आहे. ‘हाय प्रोफाईल लाईफस्टाईल’, ‘फर्स्ट लव्ह’ आणि ‘फर्स्ट टाइम रिजेक्शन’ या संकल्पना आजच्या पिढीत इतक्या वेगाने रुजल्या आहेत की प्रेमाचा खरा अर्थ आणि आयुष्य जगण्याची दिशा कुठेतरी हरवत चालली आहे.
जगातील थोर विचारवंतांनी सांगितले आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मात्र आज अपयश स्वीकारण्याची क्षमता कमी होत चालली आहे. पहिल्याच प्रेमात, पहिल्याच नकारात अनेक तरुण-तरुणी खचून जातात. या सप्ताहात बाहेरून फुललेले चेहरे, आतून मात्र गोंधळलेले आणि ताणाखाली असलेले दिसतात. नकारात्मक भावना स्वीकारण्याची वेळ आली, तर या उत्सवाचा आनंद क्षणात वेदनेत बदलतो.
एक काळ असा होता, जेव्हा प्रेमप्रकरणांकडे पालक अत्यंत कठोर नजरेने पाहत. “लफड्यात पडू नकोस, अभ्यास कर, पैसा कमव, आयुष्य घडव,” असे उपदेश दिले जात. तेव्हा पालक जणू ‘व्हॅलेंटाईन विलन’ वाटत असले, तरी त्या काळात युवकांमध्ये आजसारखे तीव्र डिप्रेशन किंवा तुटलेली जिद्द फारशी दिसत नव्हती. कारण कुठेतरी उद्याबद्दलची आशा होती, संयम होता आणि वेळेवर सगळं ठीक होईल असा विश्वास होता.
आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. एकतर्फी प्रेम, अयोग्य वेळेला भावना व्यक्त करणं, चुकीच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं हे सगळं आजच्या पिढीला महागात पडत आहे.
आयुष्यातील जबाबदाऱ्या, काळाची गरज आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याचा विचार मागे पडतो आहे. भूतकाळात अडकून राहून किंवा भविष्यातील स्वप्नांवर अति भार टाकून वर्तमान जगण्याची कला हरवत चालली आहे.
नकार म्हणजे आयुष्य संपलं असं नव्हे. “नाही” ऐकल्यावर थांबणं गरजेचं असतं—पण जगणं थांबवणं नव्हे. पर्याय शोधणं, स्वतःला थोडी विश्रांती देणं आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करणं हेच शहाणपण आहे. पेशन्स (संयम), पर्याय आणि प्रतीक्षा हे तीन गुणधर्म आज व्हॅलेंटाईन डे कडे नकारात्मक नजरेने पाहणाऱ्यांनाही आणि अतीउत्साहाने साजरा करणाऱ्यांनाही तितकेच आवश्यक आहेत.
म्हणूनच, व्हॅलेंटाईन सप्ताह साजरा करा पण दिवसांच्या नावापेक्षा भावनांच्या मर्यादा ओळखून. प्रेम करा पण स्वतःला विसरून नाही. अपेक्षा ठेवा पण वास्तवाच्या चौकटीत. कारण मन नाजूक असतं, आणि आयुष्याचा भरोसा नसतो. आज समजूतदारपणे घेतलेला निर्णयच उद्याच्या आयुष्याला दिशा देऊ शकतो.









