वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी आणि रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना मुंबईच्या पायधूनी परिसरातून समोर आली आहे. एका महिलेच्या प्रसूतीनंतर तिच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात आलेला ग्लोव्हच राहिल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अली रोड येथील नूर रुग्णालयात 10 मे रोजी संबंधित महिलेची प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर काही दिवसांनी तिला अचानक ताप येऊ लागला तसेच तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला पुन्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी केलेल्या CT स्कॅनमध्ये धक्कादायक बाब समोर आली. महिलेच्या पोटात ऑपरेशनदरम्यान वापरण्यात आलेला ग्लोव्ह असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून तो ग्लोव्ह बाहेर काढण्यात आला.
महिलेच्या पतीने रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ऑपरेशन करताना वापरलेला ग्लोव्ह महिलेच्या पोटातच राहिल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची दखल पायधूनी पोलिसांनी घेतली असून संबंधित कागदपत्रे आणि वैद्यकीय अहवालांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खासगी रुग्णालयांमधील रुग्ण सुरक्षा, शस्त्रक्रियेनंतरची तपासणी प्रक्रिया आणि वैद्यकीय जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment