Ads

पहिल्याच पावसात विकासकामांचा बोजवारा! दनोरी-पनोरीत रस्ते जलमय, नाल्यांमध्ये गाळ

By Nilesh Sir

June 28, 2026 4:18 pm

Ads

अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत दनोरी-पनोरी येथे पहिल्याच पावसाने विकासकामांच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचले असून अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

बळीराम आढे यांच्या घरापासून ते रमेश मदनकार यांच्या घरापर्यंतचा रस्ता चिखल आणि साचलेल्या घाण पाण्याने व्यापला आहे. या मार्गावरून पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. पाण्यात खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाईच करण्यात आली नाही. परिणामी गाळ साचून पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला आणि नाल्यांतील पाणी थेट रस्त्यावर आले. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असतानाही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यासोबतच ग्रामसचिव कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने गट ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पहिल्याच पावसात रस्ते जलमय, नाले तुंबले, घराकडे जाणारे मार्ग बंद आणि ग्रामसचिव कार्यालयात अनुपस्थित, अशा परिस्थितीत “नागरिकांनी तक्रार करायची तरी कुणाकडे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दनोरी-पनोरी ग्रामपंचायतीची तातडीने पाहणी करून नाल्यांची साफसफाई, साचलेल्या पाण्याचा निचरा, रस्त्यांची दुरुस्ती तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment