देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अजूनही कायम असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे रविवार, २८ जून २०२६ रोजी होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, टीईटी परीक्षेचा पेपर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या माध्यमातून बाहेर आली, तिची विक्री कोण करत होते आणि या रॅकेटमागे कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितीदारांकडून प्रश्नपत्रिका विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी कथित फुटलेली प्रश्नपत्रिका हस्तगत केली. या घडामोडीनंतर शिक्षण विभागाने कोणताही धोका न पत्करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वीही टीईटी परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत गैरव्यवहार आणि गुण वाढविण्याच्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा पेपरफुटीचा संशय समोर आल्याने शिक्षक, स्पर्धा परीक्षेचे उमेदवार आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परीक्षा पुढे कधी घेतली जाणार, याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.






Leave a Comment