Ads

मानवतेला काळिमा! जिवंतपणी आधार नाही… मृत्यूनंतरही सन्मान नाही; बेवारस मृतदेहाचा शेवटचा प्रवास कचऱ्याच्या गाडीतून!

By Nilesh Sir

June 27, 2026 3:22 pm

Ads

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. जिवंतपणी आधार नसलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवाला सन्मान मिळाला नाही. अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेऐवजी कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून मृतदेह नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी अमळनेर शहरात एक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवला. दोन दिवस नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याची वेळ आली. मात्र, शववाहिकेऐवजी हा मृतदेह चक्क नगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीतून स्मशानभूमीकडे नेण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच अमळनेरमध्ये संतापाची लाट उसळली. जिवंतपणी कोणी आधार दिला नाही, पण मृत्यूनंतर तरी सन्मान मिळायला हवा होता, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे मानवी संवेदनशीलता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने संबंधित कचरा संकलन ठेकेदारावर टाकली आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने नागरिकांचे समाधान झालेले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दिले आहे.

एका बेवारस व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासालाही सन्मान मिळू शकला नाही, ही बाब केवळ प्रशासनाची चूक नसून समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत, हा प्रश्नही या घटनेने उपस्थित केला आहे.

No comments to show.

Leave a Comment