Ads

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

By Nilesh Sir

May 28, 2026 4:47 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २८ मे २०२६ :- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या धड-विरहित मृतदेह प्रकरणात धक्कादायक उलटफेर झाला आहे. जिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाला अटक केली होती, तीच तरुणी जिवंत पोलिसांसमोर हजर झाली. या प्रकरणामुळे बुलढाणा LCB च्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खरे आरोपी कोण? मृतदेह कुणाचा? आणि निर्दोषांना अटक झाली का? वाचा संपूर्ण थरारक प्रकरण.

बुलढाण्यातील हत्याकांडात मोठा ट्विस्ट

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडवून देणारा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी धड आणि शीर वेगवेगळ्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात आता मोठा उलटफेर झाला आहे. जिची हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, ती तरुणी चक्क जिवंत निघाली असून स्वतः पोलिसांसमोर हजर झाली आहे.

या प्रकरणामुळे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा अर्थात LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे या कथित हत्येप्रकरणी त्या तरुणीच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

राजुरा शिवारातील मृतदेहाने उडवली होती खळबळ

२६ एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात अर्धवट कुजलेल्या अवस्थेत धड आणि शीर वेगवेगळे सापडले होते. या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला होता. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुलढाणा LCB ने मृतदेहाची ओळख शिवानी कळमेकर अशी पटवली होती.

शिवानी बेपत्ता असल्याची नोंद बऱ्हाणपूर पोलीस ठाण्यात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शिवानीचे वडील आणि भाऊ यांना अटक करत त्यांनीच ऑनर किलिंगच्या रागातून हत्या केल्याचा दावा केला होता.

पोलिसांच्या मते, विवाहित असलेल्या शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते. या कारणातून संतापलेल्या वडिलांनी आणि भावाने तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले होते. या तपासानंतर LCB चे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते.

तरुणी जिवंत हजर; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह

मात्र आता या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. शिवानी कळमेकर ही स्वतः तिच्या प्रियकरासोबत बऱ्हाणपूर पोलिसांसमोर हजर झाली. “मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे,” असे तिने पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. जिच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक झाली, तीच तरुणी जिवंत निघाल्याने आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

खरा मृतदेह कुणाचा होता? कोणत्या पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली? आरोपींकडून कबुली कशी घेण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

*एसपी निलेश तांबे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणासंदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही शिवानी जिवंत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली होती. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती देता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी मारहाण करून जबरदस्तीने गुन्ह्याची कबुली घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बुलढाणा LCB अडचणीत?

या प्रकरणामुळे आता बुलढाणा LCB च्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निर्दोष पिता-पुत्रांना अटक झाली का? तपासात घाई झाली का? पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला का? अशा अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने होतो आणि मृतदेहाचे खरे रहस्य उलगडते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

तुमच्या परिसरातील अशाच खळबळजनक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या पोर्टलला नियमित भेट द्या आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!