अकोला | प्रतिनिधी अकोला शहरातील लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये पाहुण्यांना पुरविण्यात येणाऱ्या थंड पाण्याच्या जारांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याचे जार किंवा बाटल्या थंड ठेवण्यासाठी बर्फाऐवजी इथिलीन ग्लायकॉल (Ethylene Glycol) या औद्योगिक रसायनाचा वापर होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनापर्यंत पोहोचल्या असून, या प्रकाराची पडताळणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसमारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाण्याचे जार अधिक वेळ थंड राहावेत यासाठी काही ठिकाणी बर्फाऐवजी औद्योगिक रसायनांचा वापर होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने तपासणीची तयारी सुरू केली आहे.
इथिलीन ग्लायकॉल हे वाहनांमध्ये अँटीफ्रीझ आणि कूलंट म्हणून वापरले जाणारे औद्योगिक रसायन आहे. हे मानवी सेवनासाठी पूर्णपणे अयोग्य असून, दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात गेल्यास मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, या रसायनामुळे गंभीर विषबाधा होऊन जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अलीकडच्या काळात अन्नभेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रकरणांविरोधात राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेत विविध ठिकाणी तपासण्या सुरू आहेत.
तपासणीदरम्यान अकोल्यातील लग्नसमारंभ किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाण्याचे जार थंड ठेवण्यासाठी घातक रसायनांचा वापर झाल्याचे आढळल्यास संबंधित आयोजक, पुरवठादार किंवा जबाबदार व्यक्तींवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नागरिकांनी अशा कार्यक्रमांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबत सतर्कता बाळगावी. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाची सूचना : या प्रकरणात सध्या तक्रारींची पडताळणी सुरू असून, घातक रसायनाचा वापर झाल्याचा अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.






Leave a Comment