Ads

एका पाठोपाठ दोन शेतकरी काळाच्या पडद्याआड!ट्रॅक्टरच्या चाकाखाली आणखी एका शेतकऱ्याचा अंत;

By Nilesh Sir

May 28, 2026 4:25 pm

Ads

खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतात राबणाऱ्या दोन कष्टकरी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाल्याने अकोला जिल्हा हादरला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या दोन हृदयद्रावक घटनांमुळे शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

अकोट तालुक्यातील बेलुरा येथे ३२ वर्षीय शेतकरी गणेश सोळंके हे शेतात काम करत असताना ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामाच्या तयारीत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

ही घटना ताजी असतानाच बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवण शिवारात आणखी एक भीषण अपघात घडला. कापसाची पराटी काढण्याचे काम सुरू असताना जीवन मंगू राठोड (वय ४७, रा. तिवसा) यांचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टरची पंजी मातीत फसल्याने त्यांचा अचानक तोल गेला आणि ते थेट चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रविण धुमाळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

सलग दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, शेतातील कामांदरम्यान सुरक्षिततेचे उपाय आवश्यक असल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.

दिवस-रात्र शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. “जगाला अन्न देणारा शेतकरीच आज सुरक्षित नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!