अकोट तालुक्यातील अडगाव खुर्द येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित वैध आणि अवैध माती खननामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य अमन गुलाबराव गवई यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार देत तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू आहे. या कामासाठी मोठ्या क्षमतेचे डम्पर आणि JCB यंत्रसामग्री वापरली जात असल्याने गावातील अडगाव ते शिरसोली हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडांमुळे आणि सततच्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरू असून, अनेक पाळीव जनावरे आणि नागरिक जखमी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
धुळीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न
खननासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गावातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उन्हाळ्यानंतर आता पावसाळा जवळ आल्याने रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेल्वे प्रकल्पासाठी माती वापरली जात असल्याचा आरोप
सदर माती खनन हे आकोट-हिवरखेड रेल्वे मार्गाच्या कामासाठी सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र हे खनन नियमानुसार परवानगी घेऊन सुरू आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमबाह्य पद्धतीने खनन होत असल्यास संबंधितांवर महसूल व खनिज विभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
खननामुळे खराब झालेला अडगाव ते शिरसोली रस्ता तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित रेल्वे कंत्राटदार कंपनीला द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या डम्पर वाहतुकीमुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणात महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि खनिज विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.







Leave a Comment