Ads

आई, बहीण, पत्नी… एका क्षणात संपले चार जीव”; सिंदेवाही जंगलातील हल्ल्याने महाराष्ट्र सुन्न

By Nilesh Sir

May 23, 2026 7:19 pm

Ads

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी तेंदूपत्ता वेचायला गेलेल्या निरपराध महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवत तब्बल चार महिलांचा बळी घेतला. जंगलात घुमलेल्या किंकाळ्या, जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावणाऱ्या महिला आणि गावात धावत येऊन मदतीसाठी ओरडणारी महिला… या सर्वांनी गुंजेवाही परिसरात भय आणि दुःखाचे सावट निर्माण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान १३ महिलांचा समूह तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. नेहमीप्रमाणे महिलांनी काम सुरू केले होते. मात्र अचानक दबा धरून बसलेल्या वाघिणीने या महिलांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी सर्व महिला पळू लागल्या, पण वाघिणीने चार महिलांवर झडप घालत त्यांना ठार केले.

या घटनेत कवडूबाई दादाची मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) या चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर एक महिला आरडाओरडा करत गावात पोहोचली आणि तिने गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन जंगलात धाव घेतली. घटनास्थळी चार महिलांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

वनविभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे जंगल परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, गतवर्षी १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) जंगलातही अशाच प्रकारच्या वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला होता. त्या जखमा अजून भरल्या नसतानाच पुन्हा एकदा चार महिलांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तेंदूपत्ता गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिलांवर सतत अशा घटना घडत असताना वनविभाग आणि प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “वाघ-मानव संघर्ष” आता केवळ सरकारी फाईलपुरता मर्यादित न राहता सामान्यांच्या जीवावर बेतू लागला आहे. जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!