अकोट प्रखंड विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणारी गोवंश हत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. गोवंश हत्या ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठीही गंभीर धोका असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.
निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख करत गोवंश हत्येबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बकरी ईद दरम्यान जाणीवपूर्वक गोवंशाची कुर्बानी दिली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाने याकडे संवेदनशील विषय म्हणून पाहावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने भारतीय संविधानातील कलम ४८ आणि ५१ (अ)(ग) चा उल्लेख करत गोवंश संरक्षण हे राज्य आणि नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्राण्यांची खरेदी-विक्री, वाहतूक आणि इअर टॅगिंग संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात गोवंश हा भारतीय शेती, पर्यावरण, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संस्कृतीचा महत्त्वाचा आधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रासायनिक शेतीमुळे जमीन आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख करत गोसंवर्धन आणि गोरक्षण ही काळाची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा संदर्भ देत गोवंश संरक्षणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आधार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“गोवंश हत्या रोखा, सामाजिक सलोखा जपा” अशी मागणी करत संघटनेने प्रशासनाला तातडीने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. आता या निवेदनावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment