अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बोराव्हा गावाजवळ घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतीकडे जाणाऱ्या दोन मित्रांवर अचानक वन्य प्राण्याने हल्ला केल्यानंतर काही क्षणांतच शांत परिसर किंकाळ्यांनी दणाणून गेला. मात्र मृत्यू समोर उभा असतानाही या दोन्ही मित्रांनी हार मानली नाही आणि वन्य प्राण्याशी थेट झुंज देत एकमेकांचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडजवळील बोराव्हा गावाच्या नाल्याजवळून दोन मित्र जात असताना अचानक वन्य प्राण्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात एका युवकाच्या मांडीचा जबर चावा घेत वन्य प्राण्याने त्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र आपल्या मित्राला वन्य प्राण्याच्या जबड्यातून वाचवण्यासाठी दुसरा मित्र जीवाची पर्वा न करता थेट त्या प्राण्यावर तुटून पडला. त्याने आरडाओरड करत आणि प्रतिकार करत वन्य प्राण्याला पळवून लावल्याची माहिती समोर आली आहे. या धाडसी झुंजीमुळे मोठी दुर्घटना टळली.
हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला तातडीने हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. वन्य प्राण्याचा वावर वाढत असल्याने वनविभागाने तातडीने पिंजरा लावून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, मित्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या युवकाच्या धाडसाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू असून “मैत्री म्हणजे काय?” याचं जिवंत उदाहरण या घटनेत पाहायला मिळालं आहे.







Leave a Comment