Ads

दररोज 17 चिता पेटतात… तरीही सत्ता शांत! महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या थांबेना;

By Nilesh Sir

May 15, 2026 9:00 am

Ads

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ज्याची प्रत्येक व्यासपीठावर स्तुती केली जाते, त्या शेतकऱ्याचं आयुष्य आज इतकं स्वस्त झालं आहे की, त्याच्या मृत्यूची बातमीही आता समाजाला हादरवत नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (NCRB) ताज्या अहवालाने महाराष्ट्राच्या कपाळावर पुन्हा एकदा काळा ठिपका उमटवला आहे. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

ही केवळ आकडेवारी नाही… हा त्या मातीतल्या माणसाचा अखेरचा आक्रोश आहे, जो आयुष्यभर दुसऱ्यांच्या पोटासाठी लढला आणि शेवटी स्वतःच्या जगण्यासमोर हरला.

दररोज सरासरी 17 शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. युद्ध नाही, महामारी नाही, दहशतवाद नाही… तरीही एका राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिक आत्महत्या करत असतील, तर तो केवळ सामाजिक प्रश्न नसतो, तो व्यवस्थेच्या नैतिक पराभवाचा जाहीरनामा असतो.

शेतकरी हा फक्त निवडणुकीत आठवणारा मतदार बनून राहिला आहे. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या घोषणा होतात, हजारो कोटींच्या पॅकेजची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय येतं? अर्ज, निकष, बँकांचे अडथळे आणि सरकारी दारातली अंतहीन प्रतीक्षा…

सरकारे बदलली, चेहरे बदलले, योजनांची नावे बदलली; पण शेतकऱ्याच्या कपाळावरचं दुःख बदललं नाही. उलट संकटांची खोली वाढत गेली.

आज शेती उत्पादन खर्च गगनाला भिडला आहे. बियाणे, खते, औषधे, डिझेल, मजुरी सगळं महागलं; पण शेतमालाचा भाव मात्र बाजाराच्या दयेवर उभा आहे. कधी कांदा रस्त्यावर फेकावा लागतो, कधी सोयाबीनला भाव नसतो, तर कधी कापसाच्या पैशासाठी शेतकरी महिनोनमहिने वाट पाहतो.

दुसरीकडे, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे. शेतमजुराला काम नाही आणि शेतकऱ्याला उत्पन्न नाही. त्यामुळे लाखो युवक गाव सोडून शहरांकडे धावत आहेत. कारण शेती आता व्यवसाय नसून संघर्षाचं दुसरं नाव बनलं आहे.

पण प्रत्येक आत्महत्येमागे फक्त एक मृतदेह नसतो… तिथे उद्ध्वस्त झालेलं एक संपूर्ण कुटुंब असतं.

घरातील कमावता माणूस गेल्यावर मागे उरतात रडणारी आई, पोरांच्या शिक्षणाची तुटलेली स्वप्नं, आयुष्यभरासाठी वैधव्य स्वीकारलेली पत्नी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं घर.

सर्वात भयानक गोष्ट म्हणजे… आता समाजही या मृत्यूंना सरावला आहे.

दरवर्षी नवे आकडे येतात… नवे अहवाल प्रसिद्ध होतात… नवी आश्वासने दिली जातात… आणि आणखी काही शेतकरी शांतपणे मृत्यूला कवटाळतात.

प्रश्न फक्त इतकाच आहे… देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याचा हक्क नेमका कधी मिळणार?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!