उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील आगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी गुरांच्या चोरीपुरत्या मर्यादित असलेल्या घटना आता थेट शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरपर्यंत पोहोचल्याने “चोर पोलिसांवर वरचढ ठरत आहेत का?” असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
आगर येथील शेतकरी चेतन फुकट यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा 744 एफ.ई.पी.एस. 48 एच.पी. ट्रॅक्टर (क्र. एमएच 30 बीएल 1593) तसेच टॉली (क्र. एमएच 30 जे 1897) अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लंपास केला. या चोरीमध्ये सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅक्टर सुरेश कराळे यांच्या शेतात कडुलिंबाच्या झाडाखाली उभा करण्यात आला होता. रात्री सुमारे 11 वाजेपर्यंत ट्रॅक्टर जागेवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सकाळी उठून पाहिले असता ट्रॅक्टर आणि टॉली दोन्ही गायब असल्याचे निदर्शनास आले. एवढा मोठा ट्रॅक्टर-टॉलीचा मुद्देमाल चोरटे सहजपणे घेऊन जातात आणि पोलिस यंत्रणेला त्याचा मागमूसही लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
विशेष म्हणजे, घटना घडून दोन दिवस उलटूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची भावना परिसरात निर्माण झाली असून “चोर मोकाट आणि पोलीस निष्क्रिय” अशी चर्चा गावागावात रंगू लागली आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, चोरी करणाऱ्या टोळीचा तातडीने शोध घ्यावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, उरळ पोलीस प्रशासन आता या प्रकरणात किती वेगाने कारवाई करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment