Ads

अगली बार आऊंगा… शेवटचा मेसेज ठरला अखेरचा निरोप; कमी गुणांमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

By Nilesh Sir

May 10, 2026 7:55 am

Ads

दहावीचा निकाल म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा… पण काहींसाठी हा निकाल मानसिक तणाव आणि नैराश्याचं कारण ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागपूर, संभाजीनगर आणि धारावीनंतर आता अकोला जिल्ह्यातूनही मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थ्याने थेट धरणात उडी घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

विठ्ठल संतोष बोर्डे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील शिंगोली गावाचा रहिवासी होता. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अखेर नैराश्याच्या भरात त्याने कारंजा रमजानपूर येथील धरणात उडी घेत जीवनयात्रा संपवली.

विशेष म्हणजे, हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी विठ्ठलने सोशल मीडियावर “अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर…” असा भावनिक स्टेट्स ठेवला होता. त्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं समोर आलं. या स्टेट्समुळे कुटुंबीयांसह मित्रमंडळीही हादरली आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी धाव घेत शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे “गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला मानसिक ताण, अपेक्षांचे ओझे आणि अपयशाची भीती यामुळे अशा घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शिक्षणतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, परीक्षा आणि गुण हे आयुष्याचा फक्त एक भाग आहेत… अपयश आलं तरी जीवन संपत नाही. पालकांनीही मुलांवर अनावश्यक दबाव न टाकता त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे.

अकोल्यातील या घटनेने पुन्हा एकदा समाजमन सुन्न केलं असून, “गुणांपेक्षा मुलांचं आयुष्य महत्त्वाचं” हा प्रश्न प्रत्येक पालक आणि समाजासमोर उभा ठाकला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!