ज्या हातांनी वर्षभर मातीत घाम गाळला…
ज्या डोळ्यांनी हिरव्यागार पिकात संसाराचं स्वप्न पाहिलं…त्या शेतकऱ्याच्या हातात अखेर उरली ती फक्त “उणे १ रुपया” ची पावती!
ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर यांची. तब्बल १२६२ किलो कांदा विकूनही त्यांच्या हातात एक रुपयाही उरला नाही. उलट बाजार समितीचे शुल्क भरताना त्यांना स्वतःच्या खिशातून १ रुपया द्यावा लागला.
ही फक्त एका शेतकऱ्याची कहाणी नाही, तर महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांच्या जखमेवरचं जिवंत वास्तव आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रकाश गलधर यांनी २५ गोणी कांदा विक्रीसाठी आणला होता. अनेक महिन्यांची मेहनत, कर्जाचं ओझं, पाण्याची चिंता आणि दिवस-रात्र केलेल्या कष्टानंतर त्यांनी हे पीक उभं केलं होतं. मात्र बाजारातील लिलावाने त्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरलं.
कांद्याला मिळालेला अत्यल्प भाव पाहून शेतकरीच नव्हे तर सामान्य नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. हमाली, तोलाई, वाराई, गोणी खर्च आणि इतर कपातींनंतर त्यांच्या हातात काहीच उरलं नाही. उलट १ रुपया स्वतःच्या खिशातून भरावा लागल्याची पावती सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि घरखर्च भागवणंही कठीण झालं आहे. “अन्नदाता” म्हणून गौरव करणाऱ्या व्यवस्थेकडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नसल्याचा आरोप आता अधिक तीव्र होत आहे.
प्रकाश गलधर यांच्या हातातील “उणे १ रुपया” ची पावती ही आता केवळ एक कागदाची चिठ्ठी राहिलेली नाही, तर महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेवर उभं राहिलेलं मोठं प्रश्नचिन्ह बनली आहे.








Leave a Comment