Ads

तलाठी की वसुली मशीन?” अकोट तालुक्यात ‘डमी तलाठ्यांचा’ धुमाकूळ;

By Nilesh Sir

May 9, 2026 5:47 am

Ads

अकोला जिल्ह्यात महसूल विभागातील कथित भ्रष्टाचार आणि खासगी दलाल राजमुळे ग्रामीण भागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सातबारा, फेरफार, वारस नोंद, खातेफोड यांसारख्या मूलभूत कामांसाठी अक्षरशः लुटले जात असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. “हे तलाठी कार्यालय आहे की वसुली केंद्र?” असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.

१५ रुपयांच्या उताऱ्यासाठी शेकडो रुपयांची वसुली?

शासनाच्या नियमानुसार काही महसूल उतारे अवघ्या १५ रुपयांत मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात नागरिकांकडून अनेक पटीने अधिक पैसे उकळले जात असल्याची चर्चा तालुकाभर रंगली आहे.

कथित वसुलीचे ‘रेटकार्ड’ :

सातबारा उतारा : ₹५० ते ₹१००

फेरफार उतारा : ₹२०० ते ₹५००

आठ-अ उतारा : ₹२०० ते ₹३००

वारस नोंद : ₹१,००० ते ₹३,०००

खाते फोडीच्या नोंदी : ₹२,००० ते ₹१०,०००

“पैसे दिल्याशिवाय फाईल हलत नाही,” असा आरोप शेतकरी आणि नागरिक करत आहेत.

तलाठी गायब… दलाल ’ मात्र सक्रिय?

ग्रामीण भागातील अनेक तलाठी कार्यालये कायम बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक गावातून तालुक्याला चकरा मारतात, मात्र तलाठी कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांची कामे दिवसन्‌दिवस रखडतात.

याहून धक्कादायक म्हणजे, अनेक ठिकाणी मूळ तलाठ्याऐवजी खासगी व्यक्ती म्हणजेच कथित “डमी तलाठी” संपूर्ण कारभार सांभाळत असल्याचा आरोप होत आहे. कोणत्या कागदासाठी किती पैसे घ्यायचे, हेच हे डमी ठरवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

“ही लोकसेवा की खुलेआम लूट?”

कधीकाळी लोकसेवेसाठी ओळखले जाणारे तलाठी पद आता “वसुलीचे केंद्र” बनल्याचा आरोप होत आहे. राजकीय दबाव असलेल्या व्यक्तींची कामे काही मिनिटांत होत असताना, सामान्य शेतकऱ्यांना मात्र दिवसन्‌दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

“तलाठ्यांच्या वसुलीचे रेटकार्ड अख्ख्या तालुक्याला माहिती असते, मग वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाला माहिती नसते का?” असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

महाऑनलाइन संथ; नागरिकांची दुहेरी अडचण

एकीकडे ‘महाऑनलाइन’ची वेबसाइट संथ गतीने चालत असल्याने ऑनलाईन उतारे वेळेत मिळत नाहीत, तर दुसरीकडे कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

कारवाईची मागणी जोरात

अकोट तालुक्यात सुरू असलेल्या या कथित दलाल प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत. महसूल विभागातील या कथित भ्रष्टाचारामुळे शासनाच्या पारदर्शक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ANN Akola News Network चे जनतेला आवाहन

तुमच्या गावातही महसूल कार्यालयात अशाच प्रकारे पैशांची मागणी, डमी तलाठी किंवा नागरिकांची अडवणूक होत असेल तर आम्हाला 7720990022या नंबर वर माहिती द्या.
ANN Akola News Network तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणार आणि अशा प्रकारांना चव्हाट्यावर आणणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!