Ads

अकोला जंक्शन की ‘डम्पिंग यार्ड’ अस्वच्छतेचा कळस! दक्षिण-मध्य रेल्वेच्या हद्दीत कचऱ्याचे डोंगर

By Nilesh Sir

May 6, 2026 6:47 pm

Ads

अकोला: विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे आणि हजारो प्रवाशांच्या दळणवळणाचे प्रमुख केंद्र असलेल्या अकोला जंक्शनची दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनास्थेमुळे मोठी ‘दुर्दशा’ झाली आहे. एकीकडे मध्य रेल्वेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे दक्षिण-मध्य रेल्वेच्या हद्दीत मात्र अस्वच्छतेने सीमा ओलांडली असून स्थानकाचे रूपांतर ‘डम्पिंग यार्ड’ मध्ये झाले आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असून, या विदारक स्थितीमुळे संताप व्यक्त होत आहे.

एकाच स्थानकावर ‘दुतोंडी’ कारभार!

अकोला जंक्शनचे व्यवस्थापन दोन विभागांत विभागले गेले आहे. प्लॅटफॉर्म क्र. १, २ आणि ३ सह मुख्य तिकीट घराचा परिसर मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असून तेथे स्वच्छता समाधानकारक आहे. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५ आणि ६ सह उत्तरेकडील तिकीट खिडकीचा परिसर दक्षिण-मध्य रेल्वेच्या ताब्यात आहे. याच परिसरात प्रवाशांना सध्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत. प्रशासनाच्या या डोळेझाक वृत्तीमुळे प्रवाशांच्या आरोग्याशी उघडपणे जीवघेणी थट्टा सुरू आहे.

रेल्वे ट्रॅक की कचराकुंडी?

प्लॅटफॉर्म क्र. ४, ५ आणि ६ वरील रेल्वे ट्रॅक कचऱ्याने अक्षरशः गुदमरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, प्लॅटफॉर्म लगतच्या भिंतींचा आधार घेत तिथे अघोषित ‘डम्पिंग यार्ड’ तयार झाले आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे राहणेही कठीण झाले आहे.

सुशोभीकरणात दारूच्या बाटल्या!

स्थानकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्र. ६ च्या प्रवेशद्वाराजवळ छोटा बगीचा तयार करण्यात आला. मात्र, आज या बगीच्यात दारूच्या बाटल्या पाहायला मिळाल्या. हा रेल्वे स्टेशन परिसर आहे की मद्यपींचा अड्डा? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. उत्तरेकडील तिकीट घराबाजूचा परिसर कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे.

‘स्वच्छता पखवाडा’ म्हणजे केवळ फोटो सेक्शन!

रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी गाजावाजा करत ‘स्वच्छता पखवाडा’ साजरा केला जातो. मात्र, अकोल्यातील स्थिती पाहता ही केवळ १५ दिवसांची ‘दिखाऊगिरी’ असल्याचे सिद्ध होते. प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला किमान मूलभूत स्वच्छता राखता येत नसेल, तर हे प्रशासनाचे अपयश नाही का?

पुरस्काराला काळिमा फासणारा प्रकार!

मध्य रेल्वेच्या भागाला मिळालेला ‘स्वच्छ स्थानक’ पुरस्कार हा अकोल्याचा मान आहे, परंतु दक्षिण-मध्य रेल्वेचा कारभार या सन्मानाला काळिमा फासत आहे. एकाच रेल्वे स्थानकावर स्वच्छतेचे असे दोन वेगवेगळे निकष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता तरी रेल्वे प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडणार का? की वरिष्ठ अधिकारी या दुरवस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार? याकडे प्रवाशांनचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!