Ads

SRPF भरतीत मोठा घोटाळा?खासगी प्रश्नसंचातील तब्बल 85 प्रश्न जशास तसे;

By Nilesh Sir

May 6, 2026 8:43 am

Ads

राज्यातील स्पर्धा परीक्षा क्षेत्र पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडले आहे. राज्य राखीव पोलीस बल अर्थात SRPF भरती परीक्षेत खासगी प्रकाशनातील p 85 प्रश्न जशास तसे आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे परीक्षेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

2 मे रोजी दौंड येथे SRPF गट-5 साठी लेखी परीक्षा पार पडली. परीक्षा झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रश्नपत्रिका आणि ‘महाराष्ट्र पब्लिकेशन’ या खासगी प्रश्नसंचाची तुलना केली असता धक्कादायक साम्य आढळून आले. तब्बल 85 प्रश्न कोणताही बदल न करता थेट प्रश्नसंचातून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रश्नपत्रिकांचे फोटो आणि तुलना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. “प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय आहे,” अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षा दिली होती. मात्र काही निवडक प्रश्नसंचातील प्रश्न तंतोतंत आल्याने समान संधीचा मुद्दा निर्माण झाला आहे.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “प्रश्नपत्रिका तयार करताना गंभीर निष्काळजीपणा झाला आहे किंवा यामध्ये मोठा घोटाळा दडलेला असू शकतो. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्यास विरोध दर्शवला आहे. “आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिली आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना देऊ नये,” असे मत अनेक उमेदवारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता परीक्षा रद्द करायची की चौकशी करून निकाल कायम ठेवायचा, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

राज्यात मागील काही वर्षांपासून भरती परीक्षा आणि पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलीस भरती, आरोग्य विभाग, शिक्षक भरती, MPSC यांसारख्या विविध परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होत चालल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे यांनी अधिकृत चौकशी सुरू केली आहे. 4 मे 2026 पासून या चौकशीला सुरुवात करण्यात आली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत SRPF गट क्रमांक 5, दौंड येथील भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणांची चौकशी होणार का, प्रश्नसंचाशी असलेले संबंध तपासले जाणार का, तसेच दोषींवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा विषय असल्याने शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हजारो युवकांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात शासन आणि पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!