Ads

आईच्या कुशीत खेळणारं लेकरू… उष्णतेच्या झळांनी कायमचं शांत झालं!

By Nilesh Sir

April 28, 2026 1:46 pm

Ads

जिल्ह्यात वाढत्या तापमानाने आता थेट निरपराध जीव घेण्यास सुरुवात केली असून, औसा तालुक्यातील गोंदी येथे अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिव्या नेताजी गोंदे (मूळ रा. पुंजी, ता. निलंगा) असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. उष्णतेच्या प्रचंड झळांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशातच औसा तालुक्यातील गोंदी येथे आपल्या माहेरी आलेल्या महिलेच्या ९ महिन्यांच्या बाळाला उष्माघाताचा गंभीर फटका बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीची आई गीता या बाळाचे बारसे आणि पथ्याचा कार्यक्रम असल्याने माहेरी आल्या होत्या. मात्र घर कमी उंचीच्या पत्र्याचे असल्याने आत प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. बाहेर तापमानाचा तडाखा आणि घरात पत्र्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे झोळीत झोपलेल्या चिमुकलीला उष्णतेचा मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला बाळाला बेचैनी आणि मळमळ जाणवत होती. मात्र शनिवारी दुपारी अचानक तिची हालचाल मंदावली आणि ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात हलवले, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात उष्णतेचा दुसरा बळी गेल्याची नोंद झाली आहे. याआधी औसा शहराजवळ एका ६० वर्षीय वृद्धाचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता.

दरम्यान, डॉक्टर आणि प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे आता ग्रामीण भागातील पत्र्याची घरेही जीवघेणी ठरत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे।

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!