Ads

ढाब्यावर छाप्यात इंधन काळाबाजाराचा भंडाफोड! पण इतके दिवस कुणाच्या छत्रछायेत?

By Nilesh Sir

April 7, 2026 8:16 am

Ads

अकोला जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा मोठा भांडाफोड झाला असून, पातूर-मालेगाव मार्गावरील एका ढाब्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल ७०० लिटर पेट्रोल, ८५० लिटर डिझेल आणि १५० रिकाम्या टाक्या असा जवळपास २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या कारवाईनंतर एक मोठा प्रश्न समोर येतोय — इतका मोठा साठा चालू असताना प्रशासन आतापर्यंत कुठे होते?

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, जिल्ह्यातील काही भागात काळाबाजार करणाऱ्या टोळ्या अजूनही सक्रिय असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मूर्तिजापूरमध्ये कारवाई झाली आणि त्यानंतर लगेच पातूरमध्ये एवढा मोठा साठा सापडतो, याचा अर्थ हा काळाबाजार एक-दोन दिवसांचा नसून दीर्घकाळापासून सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पातूर-मालेगाव मार्गावरील नॅशनल ढाब्यामागील शेडमध्ये पेट्रोल-डिझेलची अवैध विक्री सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकत आरोपींना रंगेहात पकडले. या प्रकरणी ढाबा मालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वींद्र येन्नावार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने केली.

परंतु सर्वात मोठा सवाल अजूनही अनुत्तरित आहे — इतक्या मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू असताना संबंधित यंत्रणा आत्तापर्यंत गप्प का होती? कोणाच्या आशिर्वादाने हा काळाबाजार सुरू होता?

या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असली तरी, ही फक्त सुरुवात आहे की पुन्हा कारवाई थंडावणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आता जिल्हा प्रशासनाने केवळ कारवाई दाखवण्यासाठी धाड टाकण्यापेक्षा, संपूर्ण रॅकेट उघड करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, अकोल्यात पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा काळाबाजार थांबण्याऐवजी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!