Ads

घरचं जेवणच बनलं मृत्यूचं कारण? तीन चिमुकल्यांचा एकाच वेळी मृत्यू…

By Nilesh Sir

April 6, 2026 10:28 pm

Ads

बुलढाणा तालुक्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तीन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून, आईसह एका मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाड येथील जमदार कुटुंबाने दोन दिवसांपूर्वी जेवणात वरण-भात खाल्ल्यानंतर अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला घरगुती उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुर्दैवाने, उपचारादरम्यान मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार (वय ४ वर्ष), मशीरा मोहम्मद जमदार (वय ७ वर्ष) आणि फातिमा मोहम्मद वसीम जमदार (वय ८ वर्षे) या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, कुटुंबातील आई आणि एका मुलीची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार, वरण-भातातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अन्नात नेमके काय मिसळले होते? किंवा इतर कोणते कारण आहे? याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

ही घटना अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असून, प्रशासनाने तात्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!