अचानक एक राजकीय स्फोट झाला…कालपर्यंत अफवा वाटणारी गोष्ट आज थेट राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. अकोट नगरपालिकेत भाजप आणि AIMIM एकत्र आल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, नाराजी, स्पष्टीकरणे आणि पाठिंबा माघारीपर्यंत पोहोचलेला हा सारा प्रकार अनेक प्रश्न निर्माण करून गेला.
अकोट नगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजप आणि AIMIM नगरसेवक एकत्र आल्याची चर्चा समोर येताच संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन पक्ष एकत्र आल्याच्या आरोपांवर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, आणि या कथित युतीवर तातडीने स्पष्टीकरणाची मागणी झाली.
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, AIMIM सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर अशा प्रकारे कोणतीही आघाडी झाली असेल, तर ती तात्काळ तोडण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, AIMIM पक्षानेही भाजपसोबत कोणतीही युती झालेली नसल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले. अकोट नगरपालिकेत स्थापन करण्यात आलेल्या “अकोट विकास मंच” मधून AIMIM च्या पाच नगरसेवकांनी विनाअट पाठिंबा मागे घेतल्याचे अधिकृत पत्र दिले. हे पत्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आले आहे.
कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने अकोट विकास मंचाची स्थापना केली होती. या मंचात सुरुवातीला विविध पक्षांचे नगरसेवक सहभागी झाले होते. मात्र AIMIM च्या पाठिंबा माघारीनंतर भाजप–AIMIM कथित युतीवर अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, अकोट नगरपालिकेतील सत्तासमीकरणे आता नव्याने स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.









