Ads

--

अकोला मनपा निवडणुकीत बंडखोरीचा सस्पेन्स; आज सायंकाळी स्पष्ट होणार बंडखोर माघार घेतात की मैदानात ठाम

By Nilesh Sir

January 2, 2026 5:10 pm

Ads

अकोला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून राजकारण चांगलेच तापले असून, बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात की निवडणूक रिंगणात ठाम राहतात, याचा फैसला आज २ जानेवारीच्या सायंकाळी होणार आहे. भाजपपुरतेच नव्हे, तर काँग्रेस आणि शिंदेसेना या पक्षांमध्येही उमेदवारीवरून तीव्र नाराजी उफाळून आली आहे.

अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुकांना डच्चू देण्यात आल्याने असंतोष उघडपणे समोर आला आहे. विशेष म्हणजे, काही प्रभागांत अवघ्या आठ-दहा दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याच नाराजीतून काहींनी थेट बंडखोरीचा झेंडा हाती घेतला आहे.

अर्ज दाखल झाल्यानंतर आता अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षनेतृत्वाकडून नाराजांची मनधरणी सुरू असली, तरी अनेक बंडखोर उमेदवार “माघार नाही” या भूमिकेवर ठाम असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, काही प्रभागांत शेवटच्या क्षणी डील, समजूत आणि दबावतंत्र वापरले जाण्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकूणच, तिकीट वाटपामुळे निर्माण झालेली बंडखोरी, पक्षांतर आणि अपक्ष उमेदवारांची गर्दी हीच यंदाच्या अकोला मनपा निवडणुकीची प्रमुख ओळख ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सायंकाळपर्यंत कोण माघार घेतो आणि कोण मैदानात टिकून राहतो, यावरच अनेक प्रभागांचे राजकीय गणित उलथापालथ होणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष अंतिम क्षणाकडे लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!