Ads

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

By Nilesh Sir

August 27, 2026 10:38 pm

Ads

अकोला, दि. २७ ऑगस्ट २०२६ : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अकोल्यात एक हृदयस्पर्शी घटना घडली. तब्बल पाच वर्षांपासून कुटुंबापासून दूर असलेल्या एका हरवलेल्या महिलेची अखेर तिच्या पती, मुलगी आणि भावासोबत पुनर्भेट झाली. आधार नोंदणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वयामुळे या महिलेचा कुटुंबीयांपर्यंत शोध घेणे शक्य झाले.

महिला व बाल विकास विभाग, अमरावती विभागांतर्गत अकोला येथील शासकीय महिला राज्य गृहात निराधार, निराश्रित, पीडित तसेच हरवलेल्या महिलांना निवारा आणि आवश्यक सेवा दिल्या जातात. काही काळापूर्वी पोलिसांमार्फत एका हरवलेल्या महिलेला महिला राज्य गृहात दाखल करण्यात आले होते. सदर महिला अत्यल्प बोलत असल्याने तसेच तिला स्वतःचे गाव, कुटुंबाचे नाव किंवा पत्ता सांगता येत नसल्याने तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.

महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांच्या माध्यमातून महिला राज्य गृहात आधार नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात संबंधित महिलेची आधार नोंदणी करण्यात आली. मात्र, आधार कार्ड प्राप्त होत नसल्याने सुनील लाडूलकर यांनी आधार ग्राहक सेवा प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यावेळी महिलेची नोंदणी डुप्लिकेटमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली.

सुमारे १५ दिवसांनंतर महिलेचा जुना नामांकन क्रमांक मिळाला. हा क्रमांक UIDAIच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर आधार क्रमांक प्राप्त झाला आणि महिलेचे बोटांचे ठसे घेऊन आधार कार्ड डाउनलोड करण्यात आले. आधार कार्डवरील पत्त्यावरून सदर महिला आदिलाबाद जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर सुनील लाडूलकर यांनी आदिलाबाद जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून महिलेचे छायाचित्र आणि आधार कार्डाची प्रत पाठविली. स्थानिक पोलिसांनी तपास करून अखेर महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. संबंधित ठाणेदारांनी सुनील लाडूलकर यांच्याशी संपर्क साधून महिलेचा पती आणि भाऊ पोलिस ठाण्यात उपस्थित असल्याची माहिती दिली.

त्यानंतर महिला राज्य गृहातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून महिलेचा तिच्या पती आणि कुटुंबीयांशी संपर्क घडवून आणण्यात आला. तब्बल पाच वर्षांनी आपल्या कुटुंबीयांना पाहून महिला आणि तिचे नातेवाईक भावूक झाले.

महिला राज्य गृहाच्या अधीक्षिका जयश्री हिवराले यांनी महिलेच्या पतीला पुढील पुनर्वसन आणि कुटुंबाकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी महिलेचा पती, मुलगी आणि भाऊ अकोला येथे उपस्थित झाले. आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते संबंधित महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

यावेळी अनय नावंदर यांनी महिलेचा शोध घेण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. आधार नोंदणीपासून UIDAIशी संपर्क, आधारवरील पत्त्याच्या आधारे आदिलाबाद पोलिसांशी समन्वय आणि त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधण्यापर्यंत सुनील लाडूलकर यांनी बजावलेल्या भूमिकेचे यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लक्ष्मण हगवणे, गिरीश पूसडकर, महिला राज्य गृह अधीक्षिका जयश्री हिवराले, परिवेक्षिका अधिकारी विद्या देशमुख, राजू लाडूलकर, सुनील लाडूलकर तसेच महिलेचे नातेवाईक उपस्थित होते.

पाच वर्षांनी बहिणीची, पत्नीची, आईची आणि मुलीची भेट झाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. महिलेचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या महिला व बाल विकास विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच शासकीय महिला राज्य गृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांनी आभार मानले.

हरवलेल्या आणि निराधार महिलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पुन्हा पोहोचविण्यासाठी आधार नोंदणी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय किती महत्त्वाचा ठरू शकतो, याचे हे भावनिक आणि उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे.

Related Article

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

ग्रामसेवक नाही, तर ग्रामसभा नाही!’ आगरमध्ये ग्रामस्थांचा एल्गार; कारभारावर गंभीर सवाल

घरकुल यादीत सरपंच पतीच पात्र? गांधीग्रामात खळबळ; ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!