अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दानापूर प्रतिनिधी:- पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादचा उत्सव दानापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील दोन्ही मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ईद-ए-मिलादनिमित्त लहान मुले आणि मुलींनी आठवडी बाजारातून विविध आकर्षक देखावे सादर करीत भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत दानापूर परिसरातील दोन मदरशांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी नात पठण करीत पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनकार्याचे आणि त्यांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, दर्गाह मशिदीत महिला आणि पुरुषांसाठी भव्य इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मौलाना शेख इस्लामुद्दीन (अचलपूर), शेख अजहर (वडनेर गंगई), नासिर खान (आडगाव बुद्रुक), मशिदीचे इमाम सय्यद अजहर यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अफसर खान यांनी खाऊचे वाटप केले. यावेळी मौलाना सोहेब नूर, असलम पठाण, अथहर सौदागर, फिरोज खान आदी उपस्थित होते. ईद-ए-मिलादनिमित्त आयोजित मिरवणुकीत धार्मिक उत्साहासोबतच शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश पाहायला मिळाला. संपूर्ण मिरवणूक उत्साहपूर्ण आणि शांततेच्या वातावरणात पार पडली.






Leave a Comment