गरजूंच्या हक्काचे घर साकारण्यासाठी असलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत गांधीग्रामच्या महिला सरपंच सुषमा शरद ठाकरे यांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्य शरद भगवान ठाकरे यांचे नाव पात्र ठरल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
‘गरजूंसाठीच्या घरकुल योजनेत सरपंच पतीलाच पात्रता कशी?’ असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून केला जात आहे. लाभार्थी निवडताना संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असल्याची बाब लक्षात आली नाही का? कागदपत्रांची पडताळणी नेमकी कशी झाली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजू कुटुंबांना मिळावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव लाभार्थी यादीत आल्याचा दावा झाल्याने घरकुल योजनेच्या पारदर्शकतेवरच संशयाची सावली निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून लाभार्थी निवडीची प्रक्रिया तपासावी, अशी मागणी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित सरपंच, त्यांचे पती आणि ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे घरकुल यादीतील पात्रतेमागचे नेमके सत्य काय? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.






Leave a Comment