Ads

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

By Nilesh Sir

May 31, 2026 5:46 am

Ads

मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ सत्य आहे. मात्र मृत्यूनंतरही सन्मानाने निरोप मिळावा, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. दुर्दैवाने काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांचे कोणीच नसते. अशा वेळी अकोट तालुक्यातील एक व्यक्ती माणुसकीचे अनोखे उदाहरण घालून देत आहे. वीर एकलव्य आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे हे अनोळखी मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करून समाजासमोर मानवतेचा आदर्श निर्माण करत आहेत.

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र कोणताही नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती समोर आली नाही. अशा परिस्थितीत मृतदेह बेवारस राहण्याची वेळ आली असताना पांडुरंग तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत त्या व्यक्तीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.

विशेष म्हणजे, पांडुरंग तायडे हे केवळ अंत्यसंस्कारच करत नाहीत, तर मृत व्यक्तीसाठी आवश्यक कपडे, अंत्यविधीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, धार्मिक विधी आणि सर्व व्यवस्था स्वतःच्या जबाबदारीवर उपलब्ध करून देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल पाच अनोळखी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून समाजापुढे माणुसकीचा वेगळा आदर्श ठेवला आहे.

या अंत्यविधीवेळी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उज्जैनकर, हेड कॉन्स्टेबल तोमर यांच्या उपस्थितीत वीर एकलव्य आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाचे सदस्य सागर इंगळे, विनोद लातूरकर, गणेश काकडे, सतीश ठाकूर आणि राम जैस्वाल यांनीही सहभाग घेतला.

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगात जिथे अनेकदा जिवंत माणसांशी नाती तुटताना दिसतात, तिथे मृत्यूनंतरही एका अनोळखी व्यक्तीला सन्मानाने निरोप देण्याचे कार्य खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव ठरत आहे. रक्ताचे नाते नसतानाही माणुसकीचे नाते जपणारी ही सेवा अकोटच्या सामाजिक जाणिवेचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक बनली आहे.

मृत व्यक्ती कोण होती, कुठून आली होती याची माहिती नसतानाही तिच्या शेवटच्या प्रवासात खांदा देणारे हात पुढे येतात, हेच समाजातील मानवतेचे खरे सौंदर्य असल्याची भावना या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!