Ads

हातात पुस्तक असण्याच्या वयात गळ्यात मंगळसूत्र;प्रशासनाच्या तत्परतेने वाचलं एका मुलीचं भविष्य

By Nilesh Sir

May 11, 2026 11:19 am

Ads

अकोला जिल्ह्यातील अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत एक हृदयस्पर्शी आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. खेळण्याचं, शिकण्याचं आणि स्वप्न पाहण्याचं वय असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह शुभमंगल सावधान होण्यापूर्वीच प्रशासनाने रोखत तिचं बालपण आणि भविष्य वाचवलं आहे. महिला व बालविकास विभाग, सामाजिक संस्था आणि पोलिसांच्या संयुक्त धडक कारवाईमुळे हा बालविवाह थांबवण्यात यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोट फैल पोलीस स्टेशन अंतर्गत एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २३ वर्षीय युवकासोबत विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती बालविकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि ‘ॲसेस टू जस्टीस’ आय.एस.डब्ल्यू.एस. अकोला या संस्थेला मिळाली होती.

माहिती मिळताच बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले आणि जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी तातडीने अकोट फैल पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक आर. जी. शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित मुलीच्या वयाचे पुरावे गोळा करण्यात आले आणि पोलीस पथकासह घटनास्थळी धडक देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचल्यावर विवाह मंडप सजलेला होता, ढोल-ताशांचा गजर सुरू होता आणि तब्बल ५०० हून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. मात्र, “शुभमंगल सावधान” होण्याआधीच प्रशासनाने हस्तक्षेप करत हा विवाह थांबवला.

यावेळी मुलीच्या आईने आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे विवाहाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमध्ये आणून समुपदेशन करण्यात आले. बाल कल्याण समितीने कडक इशारा देत पालकांकडून पुन्हा बालविवाह करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, विधा उंबरकर तसेच पोलीस निरीक्षक आर. जी. शेख, एएसआय विनोद चौरपगार आणि हेड कॉन्स्टेबल संतोष चिंचोळकर यांच्या तत्परतेमुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098, आपत्कालीन सेवा 112 किंवा बचपन बचाव आंदोलनच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

“बालपण वाचवा, शिक्षण टिकवा आणि सुरक्षित भविष्य घडवा” हा संदेश देणारी ही कारवाई समाजासाठी मोठा आदर्श ठरत आहे.

Related Article

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!