आईच्या डोळ्यात अश्रू… चिमुकलीच्या चेहऱ्यावर भीती… आणि न्यायासाठी पोलिस ठाण्यापासून अधिकाऱ्यांच्या दारापर्यंत सुरू असलेली एका मातेची धावपळ… अकोला शहरातून समोर आलेल्या या घटनेने पुन्हा एकदा समाजमन हादरून गेले आहे…
पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, अकोला जिल्ह्यातूनही एकामागून एक समोर येणाऱ्या घटनांनी पालकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. अजूनही समाज सुन्न असतानाच अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातून समोर आलेल्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय चिमुकलीवर तिच्याच नात्यातील अल्पवयीन मुलाकडून गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणात तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित महिला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप तिने केला आहे.
पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, ५ मे रोजी लेखी तक्रार देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, प्रक्रिया पुढे सरकली नाही. इतकंच नाही तर काही नातेवाईक आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्तींनी तक्रार नोंदवू नये म्हणून दबाव टाकल्याचाही आरोप महिलेने केला आहे. न्यायासाठी धावपळ करत अखेर संबंधित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेतली.
दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मालती कायटे यांनी स्पष्ट केले की, पोलिस तक्रार नोंदवण्यासाठी तयार होते. मात्र, तक्रारीवर स्वाक्षरी न झाल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. संबंधित महिलेला पुन्हा बयाण नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले असून, त्या आल्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच पातूर तालुक्यात दहा वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना समोर आली होती. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे अकोला जिल्ह्यात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. “चिमुकल्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







Leave a Comment