एका नव्या संसाराची स्वप्नं डोळ्यांत घेऊन माहेरी परतणारी नववधू… कुटुंबात आनंदाचं वातावरण… पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आनंदाने भरलेला प्रवास काही क्षणांतच दुःखाच्या महासागरात बदलला आणि एका भीषण अपघाताने संपूर्ण वागडकर कुटुंबावर शोककळा पसरली.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळ बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथे विवाह सोहळा पार पडल्यावर पूजा रवी वागडकर ही नववधू प्रथमच आपल्या माहेरी अकोल्याकडे नातेवाईकांसह परतत होती. मात्र, धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ त्यांच्या प्रवासी वाहनाचा भीषण अपघात झाला.
सकाळी सुमारे नऊ वाजताच्या दरम्यान महामार्गावर गाडी वेगात असताना अचानक वाहनाचे एक चाक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट महामार्गाखाली जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच तिघांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा मृत्यू झाला आहे.
तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आनंदाच्या वातावरणात निघालेला विवाहाचा प्रवास एका क्षणात दुःखात बदलला. नववधूच्या मृत्यूने वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.







Leave a Comment