अकोला जिल्ह्यातील खाण आणि स्टोन क्रशर व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांकडून बेकायदेशीर रक्कम मागितल्याचा गंभीर आरोप अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर जिल्ह्यातील प्रशासन आणि महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अकोला जिल्हा खाण आणि क्रशर उद्योजक संघाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीनुसार, संघटनेतील प्रत्येक सदस्याकडून तब्बल 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. या मागणीमुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, काही सदस्यांनी दबावाखाली ही रक्कम दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली असून, हा केवळ एक स्वतंत्र प्रकार नसून मोठ्या स्तरावरील व्यवहाराचा भाग असू शकतो, अशी चर्चा रंगत आहे.
विवेक बिजवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमच्या संघातील सदस्यांकडून प्रत्येकी 15 हजार रुपये देण्याचा दबाव टाकण्यात आला. काही जणांनी भीतीपोटी पैसे दिले. आम्ही एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून योग्य आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे.”
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर आता तपासाला वेग आला असून पुढील चौकशीत नेमकी सत्यस्थिती समोर येणार आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासनाची प्रतिमा धोक्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, हेच अधिकारी यापूर्वी अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरातील अवैध वीटभट्ट्यांच्या संदर्भात चर्चेत आले होते. त्या वेळी स्थानिक पातळीवर कारवाई करण्यात आली असली तरी ती केवळ “दिखावा” असल्याची चर्चा सुरू होती. काही मोजक्या वीटभट्टा मालकांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, वीटभट्ट्यांशी संबंधित रॉयल्टी आणि कारवाई प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर “सेटलमेंट” झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता खाण आणि क्रशर प्रकरणासोबतच वीटभट्ट्यांच्या कारभाराचीही सखोल चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून चोहोट्टा बाजार परिसरातील वीटभट्ट्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.प्रशासनातील पारदर्शकता आणि विश्वास टिकवण्यासाठी या प्रकरणात कठोर आणि निष्पक्ष कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
अकोल्यातील हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्यावरील आरोपापुरते मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेतील संभाव्य भ्रष्टाचार उघड करणारे ठरू शकते. आता प्रशासन काय भूमिका घेते आणि तपासातून कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment