Ads

-

अकोल्यातील शाळा असुरक्षित? वाढत्या आगीच्या घटनांनंतरही फायर ऑडिट नाही; प्रशासनावर गंभीर प्रश्न

By Nilesh Sir

March 11, 2026 8:51 am

Ads

अकोला जिल्ह्यात वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे तसेच नियमित फायर ऑडिटही झालेले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने २००५-०६ या कालावधीत जिल्हा परिषद शाळांसाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काही शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसविण्याची योजना राबवली होती. मात्र त्यानंतर शाळांमध्ये अग्निसुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेली यंत्रणाही आता निष्क्रिय किंवा अनुपयोगी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोला शहरातील मनपा शाळा आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच अनेक वर्षांपासून शाळांचे फायर ऑडिट झालेले नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष होणे अत्यंत गंभीर मानले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व शाळांचे फायर ऑडिट करून आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे.

शाळांमध्ये नियमित फायर ऑडिट, अग्निशमन यंत्रणा आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीबाबत प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!