देशभरातील शासकीय कार्यक्रम, शाळा तसेच अधिकृत सोहळ्यांमध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ सादर करण्याबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर करण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे बंधनकारक राहणार आहे. गीत सादर होत असताना उपस्थित नागरिकांनी आदराने उभे राहणे अनिवार्य असेल.
राष्ट्रपती उपस्थित असलेल्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये तसेच पद्म पुरस्कारांसारख्या नागरी सन्मान सोहळ्यांमध्येही ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीतापूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रपतींच्या आगमन व प्रस्थानावेळीही हे गीत वाजवले जाणार असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार सुमारे ३ मिनिटे १० सेकंद कालावधीचे ‘वंदे मातरम्’चे सर्व सहा कडवे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. १९३७ मध्ये वगळण्यात आलेली चार कडवीही पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. या कडव्यांमध्ये दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या देवतांचा उल्लेख आहे.
दरम्यान, ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा’ (Prevention of Insults to National Honour Act) याचा विस्तार करून ‘वंदे मातरम्’लाही त्यात समाविष्ट करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. या कायद्यानुसार राष्ट्रगीत किंवा राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास अथवा इतरांना आदर व्यक्त करण्यापासून रोखल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
२८ जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत ‘वंदे मातरम्’ कोणत्या कार्यक्रमांत बंधनकारक असेल, याची रूपरेषा देण्यात आली आहे. मात्र चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे किंवा प्रेक्षकांनी उभे राहणे अनिवार्य राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









