एसटीचा प्रवास अधिक आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या एनसीएमसी कार्ड योजनेचा पहिलाच दिवस प्रवासी आणि वाहकांसाठी गोंधळाचा ठरला. १ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले; मात्र, पुरेशी जनजागृती, कार्डची उपलब्धता आणि तांत्रिक अडचणी यामुळे सवलतधारक प्रवाशांना मोठा फटका बसला.
महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, तर अमृत योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के प्रवास सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड सोबत असणे आणि त्यामध्ये आवश्यक बॅलन्स असणे अनिवार्य करण्यात आले. परिणामी कार्ड नसलेल्या किंवा कार्डमध्ये बॅलन्स नसलेल्या अनेक प्रवाशांना पूर्ण रक्कम भरून तिकीट काढावे लागले.
जनजागृतीचा अभाव; प्रवासी थेट अडचणीत
एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार असल्याची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलीच नसल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. विशेषतः ग्रामीण भागातून दैनंदिन कामासाठी शहर किंवा तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला.
कार्ड काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती; मात्र कार्ड अद्याप हातात आलेले नव्हते, अशा प्रवाशांचीही अडचण झाली. कार्ड नसल्याने सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागल्याने त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला.
रिचार्ज केले, तरी बॅलन्स शून्य!
ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड होते, त्यांचीही सुटका झाली नाही. काही प्रवाशांनी कार्डमध्ये टॉपअप किंवा रिचार्ज करूनही बॅलन्स शून्य दाखवत असल्याची तक्रार केली. त्यामुळे कार्ड असूनही सवलतीचा लाभ घेता आला नाही.
याशिवाय कार्डमधील संवर्गाच्या नोंदीतही गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले. पुरुषांच्या कार्डवर महिला संवर्ग, तर ४५ वर्षांच्या महिलेचे कार्ड अमृत ज्येष्ठ नागरिकांच्या संवर्गात दाखवले जात असल्याने पहिल्याच दिवशी एनसीएमसी व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले.
एसटी महामंडळाने सवलतीच्या तिकीट व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी एनसीएमसी कार्डची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, व्यवस्था पारदर्शक करण्याच्या प्रयत्नात पहिल्याच दिवशी सवलतीच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच पूर्ण तिकीटाचा फटका बसल्याचे चित्र दिसून आले.
रक्षाबंधनानंतर महिलांच्या खिशाला फटका
रक्षाबंधनाच्या काळात महिलांसाठी एसटीची ५० टक्के सवलत महत्त्वाची ठरते. मात्र, एनसीएमसी कार्डच्या अनिवार्यतेमुळे अनेक महिलांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीटाचे पैसे मोजावे लागले. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली.
विशेषतः ग्रामीण भागातून रोजंदारी, कामकाज किंवा इतर कारणांसाठी तालुका व शहराच्या ठिकाणी येणाऱ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या नव्या व्यवस्थेचा मोठा फटका बसला.
व्यवस्था सुधारण्याच्या नावाखाली प्रवाशांचीच परीक्षा?
सवलतीच्या तिकीट प्रणालीतील बनवेगिरीला आळा घालून खऱ्या लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळावा, हा एनसीएमसी कार्डमागचा उद्देश आहे. मात्र, कार्डची उपलब्धता, रिचार्जनंतरही शून्य बॅलन्स, चुकीचे संवर्ग आणि अपुरी जनजागृती या अडचणींमुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांची परीक्षा झाली.
एकीकडे एसटी महामंडळ पारदर्शक आणि आधुनिक व्यवस्था आणण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे त्याच व्यवस्थेच्या पहिल्याच दिवशी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह सवलतधारक प्रवाशांना पूर्ण तिकीट काढावे लागले. त्यामुळे “एनसीएमसी कार्डची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रवाशांची पुरेशी तयारी करून घेतली होती का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.
प्रवाशांचा सवाल : कार्डमध्ये किती रिचार्ज करायचे, हे कळणार कसे?
एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले असले, तरी प्रवाशांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे—कार्डमध्ये नेमकी किती रक्कम रिचार्ज करायची, हे कळणार कसे? एखाद्या प्रवाशाला लांबच्या पल्ल्याचा प्रवास करायचा असेल, तर त्या प्रवासासाठी किती भाडे लागणार आणि कार्डमध्ये किती बॅलन्स ठेवावा, याची स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे. कार्डमध्ये सध्याचा बॅलन्स किती आहे, रिचार्जनंतर किती रक्कम शिल्लक राहील आणि पुन्हा रिचार्ज कधी करावे लागेल, याची माहिती सहज उपलब्ध नसल्यास प्रवाशांची ऐनवेळी कोंडी होऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी ही व्यवस्था अधिक सोपी आणि स्पष्ट असणे आवश्यक आहे.






Leave a Comment