अकोला-दर्यापूर मार्गावरील आपातापा गावाच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरीत्या साठवून ठेवलेला पेट्रोल आणि इथेनॉलचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध पेट्रोल साठवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
आपातापा गावाच्या हद्दीत अकोला-दर्यापूर रोडलगत असलेल्या एका शेडमध्ये बेकायदेशीररीत्या पेट्रोलसह मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा साठा करून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने संबंधित शेडवर छापा टाकत तपासणी केली.
या कारवाईदरम्यान तब्बल २,९८४ लिटर अवैध पेट्रोलचा साठा आढळून आला. तसेच २०० लिटर क्षमतेच्या २० प्लास्टिक बॅरलमध्ये इथेनॉल भरलेले असल्याचे आढळले. याशिवाय इथेनॉलचा वास असलेले २०० लिटर क्षमतेचे ४९ रिकामे प्लास्टिक बॅरल देखील पथकाच्या निदर्शनास आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाईत पेट्रोल आणि इथेनॉलसह प्लास्टिक बॅरल असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारवाईत मिळून आलेला २,९८४ लिटर अवैध पेट्रोलचा साठा अकोल्याचे पुरवठा निरीक्षक विश्वजीत लिंगायत यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद अजहर सय्यद ताहिर (वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक देवेश कोटे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रमोद कांबळे, गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक महेंद्र सोनार, भरतकुमार धुट, अनिस शेख तसेच जवान संतोष देकडे, विशाल बंबळकर, संतोष पटोकर, राजकुमार साळुंके, आकाश बरडे आणि सचिन गवई यांनी सहभाग घेतला.






Leave a Comment