अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक 5 जुलै 2026 :- गेली तब्बल दोन वर्षे विविध ठिकाणी भटकत असलेल्या एका गतीमंद मुलीला अखेर तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले आहे. संवेदनशील समन्वय, कायदेशीर प्रक्रिया आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एका कुटुंबाचे पुन्हा मिलन घडून आले.
संबंधित मुलीला अकोला पोलीस विभागामार्फत पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राजगृहात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महिला राजगृहाच्या अधीक्षिका जयश्री हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीची ओळख पटविणे, तिच्या कुटुंबाचा शोध घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे आणि तिच्या आईशी संपर्क साधण्याचे काम हाती घेण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रोबेशन अधिकारी विद्या देशमुख यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आईचे समुपदेशन करून मुलीला सुरक्षितपणे तिच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या आई-मुलीच्या भावनिक भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. हा क्षण उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही अत्यंत भावनिक ठरला.
महिला व बालविकास विभागाच्या संवेदनशील आणि जबाबदार कार्यपद्धतीमुळे एका कुटुंबाला पुन्हा एकत्र येण्याचा आनंद मिळाला. समाजातील गरजू, निराधार आणि विशेष काळजी आवश्यक असलेल्या महिला व मुलींसाठी विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. यावेळी महिला राजगृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






Leave a Comment