देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटली. चंद्रावर झेप घेणारा भारत डिजिटल युगात वेगाने पुढे जात आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सौंदळी-हिरापूर या गावांमध्ये आजही माणसाला मरणानंतर सन्मानाने निरोप देण्यासाठी स्मशानभूमीच नाही, ही वस्तुस्थिती मन सुन्न करणारी आहे.
गुरुवारी गावातील एका महिलेचे दुःखद निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच मुसळधार पावसामुळे गावात अंत्यसंस्कार करणे अशक्य झाले. अखेर मृतदेह दर्यापूर येथील स्मशानभूमीत नेऊन अंतिमसंस्कार करावे लागले. या घटनेने ग्रामस्थांच्या वेदना पुन्हा एकदा उफाळून आल्या.
स्मशानभूमी नसल्यामुळे गावाच्या मागील बाजूस शेताच्या बांधावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ अनेकदा येते. मात्र पावसाळ्यात चिखल, ओढे-नाले आणि खराब रस्त्यांमुळे मृतदेह नेणे अत्यंत जिकिरीचे ठरते. दुःखाच्या क्षणीही नातेवाईकांना अशा अमानवी यातना सहन कराव्या लागतात. ही केवळ गैरसोय नसून ग्रामीण भागाच्या विकासावरील मोठा प्रश्न असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असूनही अनेक वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे निधी व मंजुरीची मागणी करण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी आजही गावातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत.
“जगण्याने छळले होते; मेल्यावरही सुटका नाही!” ही ग्रामस्थांची वेदना आज शब्दांतून नव्हे, तर वास्तवातून समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही एखाद्या गावाला स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते.
आता तरी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत सौंदळी-हिरापूर गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करून अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी आर्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारण माणसाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास तरी सन्मानाने व्हावा, एवढीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.







Leave a Comment