अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई करत रामटेक शिवारातील जुगार अड्ड्यावर मोठा घाव घातला आहे. या कारवाईत १४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६ लाख २९ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दि. २९ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीनुसार रामटेक शेतशिवारातील मोठ्या नाल्याच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी पैशांच्या हारजीतीवर तीनपानी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी सापळा रचून अचानक धाड टाकली.
पोलिसांचा छापा पडताच जुगाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी परिसराला वेढा घालत १४ जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून ९ हजार ७३५ रुपये रोख रक्कम, १२ मोबाईल फोन आणि ५ मोटारसायकली असा एकूण ६ लाख २९ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि प्रदीप जोगदंड, जिपोउपनि वैजनाथ धुळे तसेच माना पोलीस स्टेशनच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
मूर्तीजापूर तालुक्यात अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा कठोर कारवाईचा धडाका पुढेही कायम राहणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.







Leave a Comment