अकोट | प्रतिनिधी :- एकीकडे पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे अकोट शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणे, ही नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष देणारी बाब ठरत आहे. अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये एअरटेल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.
भर पावसात नळ कोरडे आणि नागरिकांच्या हाती रिकामे हंडे, असे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

अखेर स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने ट्रॅक्टरची व्यवस्था करून नगर परिषदेचा टँकर भरून नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविले. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संपूर्ण घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांनाही प्रशासनासमोर हतबल व्हावे लागत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
याचदरम्यान, नगर परिषदेचा पाणीपुरवठा करणारा ट्रॅक्टर बॅटरी नसल्यामुळे बंद अवस्थेत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, अशा मूलभूत सुविधांबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करावा, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना वेठीस धरले जाणार नाही, याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
भर पावसात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणे, ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब नसून शहराच्या जलव्यवस्थापनातील गंभीर त्रुटी अधोरेखित करणारी घटना ठरत आहे. आता प्रशासन जागे होणार की नागरिकांचा संयम आणखी आजमावला जाणार, याकडे अकोटकरांचे लक्ष लागले आहे.






Leave a Comment