अकोट शहर पोलिसांच्या डायल 112 पथकाच्या तत्परतेमुळे हरवलेली महिला आणि तिची दोन वर्षांची मुलगी अवघ्या एका तासात सुखरूप शोधून काढण्यात यश आले. या कार्यवाहीमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून अकोट शहर पोलिसांच्या जलद प्रतिसादाचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५.५१ वाजताच्या सुमारास धारणी, जिल्हा अमरावती येथील अनिल परशराम जावरकर (वय २९) यांनी डायल 112 वर संपर्क साधून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि दोन वर्षांची मुलगी पायल या अकोट बसस्थानक परिसरातून हरवल्याची माहिती दिली.
या माहितीची तात्काळ दखल घेत डायल 112 वर कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत दंदी आणि पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल आढे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.
चौकशीदरम्यान अनिल जावरकर यांनी सांगितले की, ते शेगावहून धारणीला जाण्यासाठी कुटुंबासह अकोट येथे आले होते. मुलीसाठी खाऊ आणण्यासाठी काही वेळासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर परत येताच पत्नी आणि मुलगी दिसून आल्या नाहीत.
त्यानंतर पोलिसांनी बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास शोधमोहीम राबवली. अखेर दोघींना रेल्वे स्टेशन परिसरातून सुखरूप शोधून काढण्यात आले आणि त्यांना अनिल जावरकर यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहीते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिंमत दंदी आणि पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल आढे यांनी केली.






Leave a Comment