Ads

मान्सूनपूर्व मोठी तयारी! पोपटखेडमध्ये SDRF चे विशेष आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

By Nilesh Sir

June 5, 2026 2:02 pm

Ads

मान्सून हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संभाव्य पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अकोट तालुका प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार पोपटखेड प्रकल्प येथे SDRF नागपूर पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य तसेच जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात पूरस्थिती निवारण, प्रथमोपचार, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, विविध बचाव साहित्यांचा वापर आणि प्रत्यक्ष मॉक ड्रिलद्वारे बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. SDRF च्या तज्ज्ञांनी पूरग्रस्त परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमात अकोट शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, दहीहांडा पोलीस स्टेशन, होमगार्ड, नगर परिषद अकोटचे अग्निशमन व नैसर्गिक आपत्ती विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच आणि विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधायचा याची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

या संपूर्ण उपक्रमात विशेष सहकार्य करणाऱ्या वीर एकलव्य आपत्कालीन व बचाव पथक, पोपटखेड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर बचावकार्य, जनजागृती आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या या पथकाने प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले. SDRF पथकासोबत समन्वय साधून प्रत्यक्ष मॉक ड्रिलमध्येही पथकाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन, बचाव यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवी पथके सज्ज राहावीत हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, अकोट प्रशासनाची ही तयारी आगामी पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment