Ads

मान्सूनपूर्व सज्जता! अकोटमध्ये SDRF कडून आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्याचे विशेष प्रशिक्षण

By Nilesh Sir

June 5, 2026 7:10 am

Ads

मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी अकोट तालुका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार SDRF नागपूर पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव कार्य आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोपटखेड प्रकल्प, ता. अकोट येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पूरस्थिती निवारण, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, विविध बचाव साहित्यांचा वापर तसेच प्रत्यक्ष मॉक ड्रिलद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी अकोट शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, दहीहांडा पोलीस स्टेशन, होमगार्ड, नगर परिषद अकोटचे अग्निशमन व नैसर्गिक आपत्ती विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, वीर एकलव्य बचाव पथक, पूरबाधित गावांचे पोलीस पाटील आणि सरपंच यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मान्सून काळात उद्भवणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, बचाव यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज होत असलेल्या अकोट प्रशासनाच्या या उपक्रमाकडे तालुक्याचे लक्ष लागले असून, संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी ही तयारी महत्त्वाची ठरणार आहे.

No comments to show.

Leave a Comment