“रुग्णांना जीवदान देणारं हॉस्पिटल… काही क्षणांतच आगीच्या विळख्यात सापडलं…ICU मधील एसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर धुराने संपूर्ण मजला गिळंकृत केला…रुग्णांचा आक्रोश, नातेवाईकांची धावपळ आणि जीव वाचवण्यासाठी सुरू झालेली शर्थीची धडपड… अकोल्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे…
अकोला शहरातील रामदासपेठ परिसरातील सिटी हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहर हादरले आहे. रुग्णांना जीवदान देणारे हॉस्पिटल काही क्षणांतच आगीच्या विळख्यात सापडल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, वाढत्या तापमानामुळे आयसीयूमधील एसीमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू होते, तर संबंधित मजल्यावरील इतर कक्षांमध्ये तब्बल १८ रुग्ण उपचार घेत होते. अचानक धूर पसरू लागल्याने रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही मिनिटांतच संपूर्ण मजला धुराने भरून गेला आणि रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
हॉस्पिटल कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अनेक रुग्णांना स्ट्रेचर, व्हीलचेअर तसेच थेट उचलून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर सर्व रुग्णांना शहरातील इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र या घटनेनंतर आता हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फायर ऑडिट झालेल्या रुग्णालयामध्येच अशी भीषण आग लागत असेल… तर शहरातील इतर खासगी रुग्णालयांची स्थिती कितपत सुरक्षित आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ICU मध्ये जीव वाचवणारी यंत्रणाच काही क्षणांत जीवघेणी ठरल्याचे चित्र या घटनेत पाहायला मिळाले. वाढत्या तापमानामुळे इलेक्ट्रिकल यंत्रणांवर ताण वाढत असताना हॉस्पिटल प्रशासनाने आवश्यक काळजी घेतली होती का? अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे.
जर कर्मचारी आणि नागरिकांनी वेळेत मदत केली नसती… तर हे चित्र किती भयावह असू शकले असते, याची कल्पनाही करवत नाही. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट पुन्हा तपासले जाणार का? याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment