देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET 2026 परीक्षा अखेर पुन्हा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा आयोगाने जाहीर केला आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली NEET परीक्षा आता 21 जून 2026 रोजी देशभरात नव्याने आयोजित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गोंधळ आणि मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET परीक्षेनंतर देशभरात पेपरफुटीच्या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची ही सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जात असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने तपासाची सूत्रे केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI कडे सोपवली होती.
CBI च्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राजस्थान, हरियाणा, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर येथून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पेपरफुटीचे जाळे अनेक राज्यांमध्ये सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर 3 मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता राष्ट्रीय परीक्षा आयोगाने 21 जून 2026 ही नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, नव्या परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा आणि तांत्रिक पातळीवर विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख, डिजिटल मॉनिटरिंग आणि सुरक्षा यंत्रणांची विशेष तैनाती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता देशभरातून होत असून, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रक्रिया राबवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रीय परीक्षा आयोगासमोर उभे राहिले आहे.







Leave a Comment