Ads

आज या… उद्या या…” आता ‘इथेच झोपा!’ अकोट तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड

By Nilesh Sir

May 9, 2026 5:58 am

Ads

अकोट तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अक्षरशः तहसील कार्यालयातच बाकावर झोप घेण्याची वेळ आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.

गुरुवारी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. त्यानंतर कार्यालयातील सर्व कामे थांबली. आधीच “आज या… उद्या या…” अशा उत्तरांनी हैराण झालेल्या नागरिकांचा संयम अखेर संपल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिक सकाळपासून विविध दाखले, सातबारा, महसूल आणि इतर शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात थांबून होते. मात्र वीज नसल्याने संगणकीय कामकाज पूर्णपणे बंद पडले.

एकीकडे प्रचंड उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे तहसील कार्यालयातील सततच्या चकरा यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले. काही नागरिकांनी थेट कार्यालयातील बाकावर आडवे होत झोप घेतल्याचे दृश्य समोर आले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या शासकीय कार्यालयात वीज गेल्यानंतर कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जनरेटर, इन्व्हर्टर किंवा तत्काळ बॅकअपची सुविधा का उपलब्ध नव्हती? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सामान्य नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित करत तहसील प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अकोट तहसील कार्यालयातील या कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!