अकोट शहरातून अंजनगाव सुर्जी मार्गावरून भरदिवसा एक संशयास्पद विना नंबर प्लेट ट्रक फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या ट्रकचे कॅबिन एका कंपनीचे तर मागील बॉडी दुसऱ्या कंपनीची असल्याचे दिसून येत असून, संपूर्ण ट्रक मॉडिफाय करण्यात आल्याने अवैध वाहतुकीचा संशय अधिक गडद झाला आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे हा ट्रक नेमका कोणाचा? कुठून आला? आणि कोणत्या मालाची वाहतूक करत होता? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मुख्य मार्गावरून हा ट्रक खुलेआम फिरत असताना वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाला तो दिसला नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, विना नंबर प्लेट वाहने अनेकदा अवैध धंदे, तस्करी किंवा नियमबाह्य वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे गंभीर अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा शोध घेणे कठीण होते. तरीही अशा संशयास्पद वाहनांवर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक नियमांनुसार कोणतेही वाहन नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर चालवणे गंभीर गुन्हा मानला जातो. तसेच परवानगीशिवाय वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात मॉडिफिकेशन करणेही बेकायदेशीर आहे. तरीही अकोट शहरातून अशा प्रकारचे ट्रक खुलेआम फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या संशयास्पद ट्रकची तात्काळ चौकशी करून संबंधित वाहनचालक आणि मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







Leave a Comment