अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक ७ एप्रिल २०२६ : अकोला रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता सामान्य प्रवाशांशिवाय रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सप्टेंबर २०२५: मलकापूर येथे कार्यरत असलेल्या एका आरपीएफ कर्मचाऱ्याची दुचाकी अकोला स्थानकाच्या पार्किंगमधून चोरीला गेली. घाईत असताना कूपन न घेतल्याचा फायदा चोरट्यांनी उचलला.
जानेवारी २०२६: एका प्रवाशाने रीतसर कूपन घेऊन गाडी पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, संशयित आरोपीने पार्किंग कर्मचाऱ्यांना बनावट आधारकार्ड दाखवून आणि कूपन हरवल्याचे सांगून दिशाभूल केली व गाडी चोरून नेली. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे.
मार्च २०२६: एका होमगार्ड कर्मचाऱ्याने आपली दुचाकी ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभी केली होती, जिथून चोरट्यांनी ती लंपास केली.
बडनेरा स्थानकावर वरिष्ठ लिपिकाची गाडी चोरीला
नुकत्याच घडलेल्या ताज्या घटनेत, बडनेरा जंक्शन येथील नवीन बुकिंग ऑफिसच्या गेटजवळ एका वरिष्ठ बुकिंग क्लर्कने आपली दुचाकी उभी केली होती. ड्युटी संपवून परतल्यानंतर त्यांना आपली गाडी त्या ठिकाणी आढळून आली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अकोला, बडनेरासह इंदूर, नागपूर आणि बिलासपूर यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची वाहनेच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या मालमत्तेचे काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
आवाहन
वाहनधारकांनी आपली वाहने नेहमी अधिकृत पार्किंगमध्येच उभी करावीत. अधिकृत कूपन घेतल्यामुळे चोरीच्या घटनेत कायदेशीर प्रक्रिया करणे सोपे होते. तसेच, पार्किंग क्षेत्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत होते. नो-पार्किंगमध्ये वाहने लावणे टाळावे.







Leave a Comment