Ads

अकोट तालुक्यात बांधकाम कामगार योजनेचा मोठा ‘स्कॅम’?

By Nilesh Sir

February 28, 2026 3:22 am

Ads

अकोट तालुक्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत साहित्य वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप मजुरांकडून केला जात आहे. अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी आणि नोंदणी प्रक्रियेच्या नावाखाली मजुरांकडून अवाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, एका विशिष्ट पक्षाशी संबंधित काही कार्यकर्ते खासगी एजंट म्हणून काम करत असल्याचे आरोप समोर येत आहेत. अर्ज प्रक्रिया सुलभ करून देण्याचे आश्वासन देत भांडी संच, सुरक्षा साहित्य आणि इतर लाभांसाठी हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचे सांगितले जाते. अधिकृत परवानगी नसतानाही आमच्याशिवाय काम होणार नाही, असा दबाव टाकला जात असल्याची तक्रार अनेक मजुरांनी केली आहे.

यामुळे पात्र व कष्टकरी बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहत असून बोगस लाभार्थींना फायदा मिळत असल्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हापावसात कष्ट करणारे गवंडी, सुतार, प्लंबर आणि इतर बांधकाम मजुरांपर्यंत योजनांची थेट व पारदर्शक माहिती पोहोचत नसल्याने दलालांचे जाळे मजबूत होत असल्याचे चित्र आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयप्रक्रियेची पडताळणी करावी, तसेच एजंटांच्या माध्यमातून चालणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दोषींवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई झाल्यासच खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळेल, अशी भावना मजुरांत व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!